Tuesday, 17 December 2019

रंगाने काळा पण चतुर वेगळा

पशु पक्षांना देखील भावना असतात. ते देखील विचार करतात. आपण लहानपणी इसापनीतीमधून अनेक गोष्टी वाचल्या आहेत. एक हुशार कावळा त्याला तहान लागल्यावर रांजणातील खोल पाणी पिण्यासाठी त्यात लहान लहान खडे टाकतो आणि पाण्याची पातळी वर आणून मग ते पाणी पितो ही गोष्ट आपल्या परिचयाची आहेच.

खरंच कावळे एवढे तल्लख बुद्धीचे असतात का?

हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही कावळ्यांवर प्रयोग केले. त्यातील काही कावळ्यांना त्यांनी विशिष्ट प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामध्ये कावळ्यांना व्हेंडिंग मशीनमध्ये वेगवेगळ्या आकाराचे कागद त्यांच्यासमोर ठेवण्यात आले. ठराविक आकाराचे कागद जर कावळ्यांनी व्हेंडिंग मशीनमध्ये घातले, तर त्या मशीनमधून मांसाचे तुकडे बाहेर पडत होते. कावळे हे शिकल्यानंतर शास्त्रज्ञांनी कागदाचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे उचलून त्याजागी एक अखंड कागद ठेवून दिला. तेव्हा असे दिसून आले, की कावळ्यांनी त्या अखंड कागदाचे योग्य असे तुकडे केले आणि व्हेंडिंग मशीनमध्ये ते टाकून त्या बदल्यात त्यांच्या आवडीचे मांसाचे तुकडे मिळवले. विशेष म्हणजे आधीचे तुकडे कावळ्यांसमोर नसताना सुद्धा निव्वळ त्यांनी स्मरणशक्तीच्या जोरावर हे काम चोख बजावले.

बघितलं? कावळे काळे असले तरी किती हुशार असतात ते! कावळ्यांच्या मेंदू आणि शरीराच्या आकाराचे गुणोत्तर हे माणसाच्या मेंदू आणि शरीराच्या आकाराच्या गुणोत्तराच्या जवळपास असते. कावळ्यांचा मेंदू हा तल्लख असतो हे वरील उदाहरणावरून दिसून येते.

कावळे अभ्यासकांना कावळ्यांना सामोरे जाताना मुखवटे धारण करावे लागतात, अन्यथा हे तीक्ष्ण स्मरणशक्तीचे कावळे पुढील वेळेस या अभ्यासकांना घायाळ करतात. इथेच ते थांबत नाहीत, तर कावळे त्यांच्या मित्र परिवाराला देखील त्रास देणाऱ्या व्यक्तीचे/ पशूंचे वर्णन तंतोतंत सांगतात, म्हणजे योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर हे कावळे आपल्या मागे लागून आपल्याला घायाळ करण्याची शक्यता असते. या सगळ्या प्रकारामुळे ठरलेला मुखवटा न घालता प्रत्येक वेळी वेगवेगळे मुखवटे घालून कावळे अभ्यासकांना त्यांच्या समोर जावे लागते. इतकेच नव्हे, तर हे कावळे त्यांच्या मुलाबाळांना सुद्धा तुमच्या कृत्याबद्दल सांगतात, म्हणून कावळ्यांच्या नादी लागणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखेच आहे.

कावळे त्यांचे अन्न वेगवेगळ्या जागी लपवून ठेवतात. याशिवाय भुकेच्या वेळी ते एक विशिष्ट काव काव असा आवाज काढतात. यावरूनच कदाचित पोटात कावळे ओरडणे हा वाक्प्रचार प्रचलित झाला असावा.
सफाई कामगारांचे रस्ते कावळ्यांना नेमके माहीत असतात, कारण कावळ्यांच्या आवडीचे खाद्य तेच तर पुरवतात.

आपण अनेकदा कावळ्यांच्या थव्याला विविध आवाज काढताना ऐकतो, तेव्हा ते चक्क एकमेकांशी गप्पा मारत असतात, अनुभव कथन करत असतात. म्हणजे त्यांच्याही review meetings होत असाव्यात.

ते स्वतः आधुनिक बदल लवकर आत्मसात करतात. रस्त्यावरचे सिग्नल कावळे चांगलेच शिकले आहेत. हिरवा सिग्नल पडणार हे पाहून ते कठीण कवच असलेली फळे आधीच रस्त्यावर टाकतात. गाड्या त्यावरून गेल्या म्हणजे मग यांना कवच काढलेले फळ आयते खायला मिळते.

यासारख्या अनेक आश्चर्यकारक स्वभाव छटा असलेला कावळा हा साथीदाराशी मात्र माणसापेक्षाही प्रामाणिक असतो, आयुष्यभर एकाच साथीदाराशी प्रणयसंबंध ठेवतो. परंतु कावळे थोड्या आळशीपणामुळे अंडी घालण्यासाठी इतर पक्षांचे घरटे वापरतात. कावळ्याची मादी जेव्हा अंडी उबवत असते, तेव्हा तिचे रक्षण मात्र बाकीचे सगळेच कावळे करत असतात. यावरून मनुष्यासारखेच सामाजिक संबंध कावळे सुद्धा प्रस्थापित करतात हे दिसून येते.

कदाचित या सगळ्या गोष्टींच्या परीक्षणावरूनच कावळ्यांना हिंदू धर्मात अंत्येष्टी कार्यांत विशेष स्थान मिळाले असेल का? रंगाने काळा असला तरी त्याचे बौद्धिक सामर्थ्य पाहून नक्कीच आपल्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला असेल?

✍️ सौ. राखी कुलकर्णी

No comments:

Post a Comment